लोणार (हॅलो बुलढाणा/ लखन जाधव) शासनाने वेगवेगळ्या योजना एकाच वेळी कार्यन्वित केल्यामुळे सर्व्हर क्षमता कमी झाली आहे. परिणामी लोणार शहरामधील तसेच तालुक्यामधील स्वस्त धान्य दुकानदार व शिधापत्रिका धारक यांची अक्षरशः तारांबळ उडालेली आहे. मग शिधापत्रिका ई-केवायसी होणार कशी? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रत्येक शिधा पत्रिका धारकाला आता ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिधा पत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ईकेवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास सबंधीताना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही. असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारक आपले सर्व कुटुंब घेऊन ई केवायसी करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात येत आहेत. परंतु मागील वीस दिसापासून ई केवायसी चे सर्व्हर डाऊन असल्यामुळे तांत्रिक अडचणी दररोज येत आहेत त्यामुळे वयोवृद्ध नागरिक व कुटुंब प्रमुख ई केवायसीसाठी स्वस्त धान्य दुकानांमध्ये बसून राहत असल्याचे चित्र दिसत आहे. तरी शासनाने ह्या बाबतीत लक्ष घालून तालुक्यामधील शिधापत्रिका धारकांची स्वस्त धान्य दुकानांमध्ये फेऱ्या मारण्याचे हेलपाटे थांबवावे हि जनतेकडून मागणी होत आहे.
शेतकरी शेतामध्ये काम करणाऱ्या महिला, नागरिक, विद्यार्थी हे दुकानामध्ये सर्व काम सोडून तासंतास येऊन कार्यालयात बसत आहेत परंतु एकीकडे सर्वर डाऊन असल्याने कोणतेही काम होत नसल्याने संपूर्ण दिवस यासाठी जात असल्याने हि ई केवायसी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. ईकेवायसीचे सर्व्हर डाऊन
असल्यामुळे समस्त नागरिकांची स्वस्त धान्य दुकानामध्ये फेऱ्या मारण्यासाठी त्रास होत असून सर्वर डाऊनमुळे नागरिकांचे कोणतेही काम होत नसल्याने नागरिकांमध्ये व स्वस्त दुकानदारांमध्ये अनेकवेळा वादविवाद व चकमकी होत आहेत. त्यासाठी ईकेवायसीचे सर्व्हर सुरळीत व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी समस्त नागरिकांच्या सोयीसाठी शासनाने ह्या बाबतीत लक्ष घालून नागरिकांचा होणारा त्रास दूर करावा,अशी समस्त लोणार तालुका वाशियांची मागणी आहे.