spot_img
spot_img

भीतीला ‘ब्रेक’, सुरक्षिततेची शिकवण थेट! शारदा ज्ञानपीठात न्यायाधीश अन् पोलीस अधीक्षकांकडून विद्यार्थ्यांना ‘पोक्सो’चे धडे!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भीती, दबाव किंवा प्रलोभनाला बळी पडू नका; स्वतःचे हक्क ओळखा आणि अनुचित प्रकारांविरोधात आवाज उठवा, असा संदेश शारदा ज्ञानपीठातील विद्यार्थ्यांना देण्यात आला. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणाऱ्या ‘पोक्सो’ कायद्याविषयी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, बाल कल्याण अधिकारी राजदीप वानखेडे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नितीन पाटील यांनी मार्गदर्शन केले. डॉ. मनीषा चव्हाण यांची सन्माननीय उपस्थिती होती.

बालकांचे कायदेशीर अधिकार, वैयक्तिक सुरक्षितता, चांगला व वाईट स्पर्श ओळखणे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि तक्रार करण्याची कायदेशीर प्रक्रिया याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. अडचणीच्या प्रसंगी भीतीने मौन बाळगण्याऐवजी मदत घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी व्यवस्थापन मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. तुषार महाजन, सचिव ॲड. रामानंद कवीमंडन, व्यवस्थापिका ज्योत्स्ना जगताप, मुख्याध्यापक दीपक देशपांडे, उपमुख्याध्यापक संदीप काळकर व पर्यवेक्षिका आरती पांढरे उपस्थित होते.

शिक्षणासोबत कायद्याची जाणीव आणि स्वतःच्या सुरक्षिततेचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यावर कार्यशाळेत भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आरती पांढरे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

कायद्याची ओळख, हक्कांची जाणीव आणि सुरक्षिततेबाबत सजगता निर्माण करणारी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली. सुरक्षित व जबाबदार समाजनिर्मितीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व यानिमित्ताने अधोरेखित झाले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!