जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) दुष्काळाने आर्थिक कोंडीत सापडलेल्या बळीराजाची दिवाळी गोड करण्यासाठी जळगाव जामोद तहसील प्रशासनाने कामाचा वेग वाढवला आहे. शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पोहोचावी, यासाठी शनिवार-रविवारच्या सुट्टीतही कर्मचारी कार्यालयात काम करीत आहेत.
जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे आणि तहसीलदार पवन पाटील यांच्या नेतृत्वात लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्यापासून ती अपलोड करण्यापर्यंतच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. पाटील स्वतः उपस्थित राहून कामावर लक्ष ठेवत आहेत.
नायब तहसीलदार भारत कीटे यांच्यासह डॉ. अशोक सरवदे, विनायक राऊत, म्हसाळ, प्रज्वल टिक्कस, अनिल दुभाळकर, सोनोने आणि मंगेश हागे या प्रक्रियेसाठी कार्यरत आहेत. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि महसूल कर्मचारी लाभार्थ्यांच्या याद्या, बँक खात्यांचा तपशील व आधार संलग्नतेची पडताळणी करीत आहेत.
कागदपत्रांतील त्रुटी आणि तांत्रिक अडचणींमुळे मदत रखडू नये, यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटीद्वारे रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांची माहिती वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असून, सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात कागदपत्रांची तपासणी सुरू आहे





Total Users : 3698810