अंजनगाव सुर्जी (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) श्रद्धेला भव्य स्मारकाचे रूप आणि संतविचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे बळ मिळणार आहे! संत शिरोमणी रुपलाल महाराज यांच्या पुण्यभूमी अंजनगाव सुर्जी येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी ८०.२६ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपयांच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस जळगाव जामोद चे आमदार डॉ. संजय कुटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक उभारणीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निधीबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे स्मारकाच्या पुढील प्रक्रियेला आणि उभारणीच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
केवळ वास्तू नव्हे; संतांच्या विचारांचा जागर!
संत शिरोमणी रुपलाल महाराज यांनी अध्यात्मासोबत समाजप्रबोधन आणि मानवकल्याणाचा संदेश दिला. त्यांची शिकवण, सामाजिक कार्य आणि विचारांचा वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे स्मारक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. महाराजांच्या कार्याची व्यापक ओळख निर्माण करणारे केंद्र म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.
अंजनगाव सुर्जीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीला या स्मारकामुळे अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. निधीच्या मान्यतेमुळे भाविक आणि महाराजांच्या अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतांच्या स्मृती जपण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, ही अपेक्षाही या निर्णयातून अधोरेखित होत आहे.
आता लक्ष मंजुरीनंतरच्या प्रत्यक्ष वाटचालीकडे!
एकूण ८०.२६ कोटींच्या निधीला मान्यता आणि सुरुवातीच्या टप्प्यात ५० कोटींच्या खर्चाला मंजुरी, या दोन महत्त्वपूर्ण निर्णयांनंतर प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंजूर निधीतून स्मारक उभारणीची प्रक्रिया पुढे कशी सरकते, याविषयी भाविकांमध्ये उत्सुकता आहे.
श्रद्धा, अध्यात्म आणि समाजप्रबोधन यांचा संगम घडविणारे हे स्मारक भविष्यात संतविचारांचे प्रेरणाकेंद्र ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही व्यक्त केले जात आहेत.





Total Users : 3680106