देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) मसाल्याच्या आस्थापनांना सील लागल्यानंतर आता उघड्या माळरानावर मसाल्याची असंख्य पाकिटे आढळल्याने देऊळगाव राजा परिसरात गंभीर प्रश्न उभे ठाकले आहेत. हा मसाला इथे आला कसा? तो फेकणारे कोण? कारवाईशी या प्रकाराचा काही संबंध आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
दोन दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने देऊळगाव राजानजीक पिंपळनेर शिवारातील दोन मसाला व्यावसायिकांवर कारवाई केली होती. उपलब्ध माहितीनुसार, जवळपास एक कोटी रुपयांचा मसाला जप्त करून दोन्ही आस्थापने सील करण्यात आली. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिसरातील माळरानावर अज्ञात व्यक्तीने मोठ्या प्रमाणात मसाल्याची पाकिटे फेकल्याचा प्रकार समोर आला आहे.
फेकलेल्या पाकिटांवर JSM नाव; मात्र संबंधाची पुष्टी नाही!
कारवाई झालेल्या व्यावसायिकांपैकी JSM नावाशी साधर्म्य असलेली पाकिटे घटनास्थळी दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, केवळ पाकिटांवरील नावावरून संबंधित व्यवसायानेच हा मसाला फेकल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. पाकिटांवरील बॅच क्रमांक, उत्पादनाची माहिती आणि साठ्याच्या नोंदी तपासल्यास यामागील धागेदोरे मिळू शकतात.
‘आम्ही जप्त केलेला मसाला सुरक्षित आहे!’
यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाचे बुलढाणा उपायुक्त प्रमोद पाटील यांना दूरध्वनीवरून विचारणा केली असता, “ज्या दोन मसाला व्यावसायिकांवर आम्ही कारवाई केली, त्यांच्याकडून जप्त केलेला मसाला सुरक्षित आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे माळरानावर पडलेला मसाला हाच जप्त केलेला साठा असल्याचा दावा करता येत नाही.
तरीही उघड्यावर अन्नपदार्थ आणि त्यांची पाकिटे टाकण्याचा प्रकार दुर्लक्षित करण्यासारखा नाही. मसाल्याची गुणवत्ता, संभाव्य आरोग्यधोका आणि पर्यावरणावरील परिणाम तपासणीतून स्पष्ट होणे आवश्यक आहे.
आता पंचनामा, नमुने आणि जबाबदारी निश्चित होणार का?
FDA, स्थानिक प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने समन्वयाने घटनास्थळाची पाहणी करून नमुने घ्यावेत, पाकिटांची ओळख तपासावी आणि मसाला फेकणाऱ्यांचा शोध घ्यावा. तपासणीपूर्वी हा मसाला बनावट किंवा विषारी असल्याचा शिक्का मारता येणार नाही; पण तो उघड्यावर का टाकला, याचे उत्तर मिळालेच पाहिजे. कारवाईच्या भीतीने साठा टाकला की यामागे दुसरे कारण आहे? सत्य चौकशीतूनच समोर येईल; प्रशासन आता किती वेगाने पावले उचलते, हे महत्त्वाचे!





Total Users : 3680106