लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार) माँ कमळजा देवीचे मूळ मंदिर सरोवराच्या वाढत्या पाणीपातळीमुळे पाण्याखाली गेले असले, तरी भाविकांच्या श्रद्धेचा ओघ कायम आहे. दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी लोणार नगर परिषदेने आरओचे शुद्ध, थंड पिण्याचे पाणी आणि फिरत्या शौचालयाची व्यवस्था केली आहे.
नगराध्यक्ष सौ. मीराताई भूषण मापारी आणि माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक भूषण पाटील मापारी यांच्या पुढाकारातून सरोवराच्या काठावर या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विशेषतः महिला भाविकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मूळ मंदिर पाण्याखाली गेल्याने कमळजा माता सेवा संघाने मंदिरालगतच्या खुल्या पटांगणात शेड उभारून देवीची प्रतिमा दर्शनासाठी ठेवली आहे. येथे भाविकांची मोठी गर्दी होत असून, नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ही गरज ओळखून नगर परिषदेने तातडीने पावले उचलली. ‘स्वच्छ लोणार, सुंदर लोणार’चा संदेश देत पाणी आणि स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध केल्याने परिसरातील स्वच्छता राखण्यासही मदत होणार आहे.
दर्शनासोबत मूलभूत सुविधांची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे भाविकांकडून कौतुक होत आहे. भाविकांची अडचण ओळखून केलेली ही व्यवस्था नगर परिषदेच्या संवेदनशीलतेची ठोस प्रचिती देत आहे.






Total Users : 3607975