बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पाऊस गायब… शेतात उभी पिके करपली… सोयाबीनच्या शेंगा आहेत, पण आत दाणाच नाही! बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या या विदारक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. खामगाव तालुक्यातील कोलारी तसेच मोताळा तालुक्यातील खडकी खामखेड, रोहिणखेड आणि टाकळी येथे त्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून नुकसान पाहिले.
शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर आपल्या व्यथा मांडताना काही भागांत पिकांचे १०० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे सांगितले. सोयाबीनसह इतर खरीप पिकांची अवस्था गंभीर असून, शेंगांना दाणेच भरले नसल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत, “सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” अशी ग्वाही दिली. पीक नुकसानीचे पंचनामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पीक विमा आणि शासकीय मदतीबाबत शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल, तसेच केंद्र सरकारकडूनही राज्यासाठी आवश्यक मदत मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.एका शेतकऱ्याने मुलाच्या शिक्षणाची अडचण सांगितल्यानंतर त्यासाठी आवश्यक मदतीचे आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात मंत्री संजय राठोड, आकाश फुंडकर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार संजय गायकवाड यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते











Total Users : 3505119