जानेफळ (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला… परिस्थिती चिघळण्याची शक्यता… आणि अचानक पोलीस यंत्रणेला कॉल! मात्र ही प्रत्यक्ष घटना नव्हती, तर आपत्कालीन परिस्थितीत पोलीस यंत्रणा किती वेगाने आणि सक्षमपणे प्रतिसाद देते, याची परीक्षा घेण्यासाठी जानेफळ पोलिसांनी राबवलेला ‘दंगा काबू योजना’ मॉक ड्रिल होता.
जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील घुटी वेस येथे हा फेक कॉल देण्यात आला. कॉल मिळताच अधिकारी, अंमलदार आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणासाठी आवश्यक बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या.
परिस्थिती गंभीर असल्याचे गृहीत धरून मेहकर डिव्हिजनचे RCP पथक, तसेच मेहकर आणि डोणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. संभाव्य जखमींसाठी जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्बुलन्स, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी देखील सज्ज ठेवण्यात आले.
मॉक ड्रिलमध्ये पोलीस मनुष्यबळ किती वेळेत एकत्र होते, अधिकारी घटनास्थळी किती तत्परतेने पोहोचतात, विविध पोलीस पथकांमध्ये समन्वय कसा साधला जातो आणि दंगलसदृश परिस्थितीत कायदेशीर व प्रतिबंधात्मक कारवाई कशी केली जाते, याची कसून पाहणी करण्यात आली.
दोन्ही गटांच्या प्रमुखांची शांतता समिती सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. तसेच जानेफळ शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉईंट बंदोबस्ताची आखणी करण्यात आली. एकूणच अचानक उद्भवणाऱ्या तणावपूर्ण परिस्थितीसमोर पोलीस यंत्रणा किती सज्ज आहे, याची ही रंगीत तालीम ठरली












Total Users : 3483039