बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भीम आर्मीचे संघटन जिल्ह्यात मजबूत करून जनतेला न्याय आणि संरक्षण मिळवून देण्यासाठी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी वज्रमूठ आवळली आहे. त्या दृष्टीने १८ जुलै रोजी बुलढाण्यातील विश्रामगृहात भीम आर्मीची संवाद बैठक आयोजित केली आहे.
भीम आर्मीचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वामध्ये भीम आर्मी संघटनेचा झंझावात मोठ्या ताकदीने सुरू आहे. देशभरातील परिवर्तनवादी समूदाय भीम आर्मी संघटनेला आशेचा एकमेव किरण म्हणून पाहत आहे. त्यामुळे भीम आर्मीची संघटनात्मक बांधणी व्यापक पातळीवर करणे आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असल्याचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी म्हटले आहे. भीम आर्मी या संघटनेची जिल्हाभर व्यापक व रचनात्मक स्वरूपाची बांधणी व्हावी, या हेतूने १८ जुलै २०२४ रोजी शासकीय विश्रामगृह येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या सत्रामध्ये बैठक झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात विविध पदावर तालुका तथा जिल्हा पातळीवर काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही बैठक आणि मुलाखती चालणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सक्रिय तथा नव्याने काम करू इच्छित असणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन सतीश पवार यांनी केले आहे.