बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शासन शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे किंवा नाही हे प्रत्येकाला माहित आहे. शासन शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत करीत असल्याचे गाजर दाखविते. खरे तर शेतकऱ्यांना भुलथापा देणाऱ्या शासनाचा आज शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला.रब्बी हंगामातील पिक विम्याची रक्कम अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही. आणि आता पंतप्रधान पीक विमा योजनेत केवळ 1 रुपये भरुन पीक विम्याचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम 2023 मधील पीक विमा रक्कम तत्काळ जमा करणे बाबत जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिले आहे. मौजे सावत्रा व सोनार गव्हाण मधील शेतकरी यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत रब्बी हंगाम 2023 मध्ये हरभरा पिकाचा
विमा उतरवला होता.माहे नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये अवेळी झालेल्या पावसामुळे हरभरा पिकाचे आतोनात नुकसान झालेले होते.
कंपनीच्या नियमांप्रमाणे 72 तासांच्या आत पीक नुकसानीची तक्रार एप्लिकेशन, फोन, ईमेल द्वारे केलेली होती. या तक्रारीची दखल घेऊन कंपनीचे प्रतिनिधी यांनी
संबंधित शेतात येऊन पीक नुकसानीचा पंचनामा केलेला आहे. खरीप हंगाम सुरू झालेला असून, रब्बी हंगामातील पीक विमा रक्कम अद्याप पर्यंत या शेतकऱ्यांच्या
खात्यात जमा न झाल्यामुळे, शेतकरी यांनी पैसे उसने घेऊन, कर्ज काढून पैशांची जमवाजमव करून सोयाबीन पिकाची पेरणी केलेली आहे. दरम्यान रब्बी हंगामातील पीक विमा रक्कम त्वरित या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.