चिखली (हॅलो बुलढाणा) चिखली नगर परिषदेने तब्बल २४९५ भटक्या कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण केल्याचा दावा केला; मात्र माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार केवळ ४९३ GPS फोटो उपलब्ध आहेत. उर्वरित कामाचे पुरावे कुठे आहेत? पशुवैद्यकीय अभिलेख, शस्त्रक्रिया नोंदी, लसीकरणाची माहिती आणि औषधांचा हिशेब नसताना कंत्राटदाराची लाखोंची देयके नेमकी कोणत्या आधारावर मंजूर झाली? या प्रश्नांनी आता चिखली नगर परिषदेच्या कारभारावर संशयाचे गंभीर ढग दाटले आहेत!
मंथन न्यूज अँड पब्लिकेशन्सचे सचिन सुभाष राठी यांनी २९ मे २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. मात्र, ८० दिवस उलटूनही कार्यवाही अथवा पत्रव्यवहार झाला नसल्याचा आरोप करीत त्यांनी १८ ऑगस्ट रोजी पुन्हा स्मरणपत्र दिले आहे.
राठी यांच्या निवेदनानुसार, सन २०२२-२३ ते २०२५-२६ या काळात योजनेची अंदाजे ४६.६५ लाख रुपयांची कामे दाखविण्यात आली. सप सप्टेंबर २०२५ पर्यंत कंत्राटदाराला करकपातीपूर्वी सुमारे ३०.६४ लाख रुपये अदा करण्यात आले. मात्र कुत्रा नोंदवही, नसबंदी व लसीकरण नोंदी, पशुवैद्यकीय अभिलेख, जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट, लसींचे बॅच तपशील, औषधसाठा आणि डिजिटल अभिलेख उपलब्ध नसल्याचे नगर परिषदेने लेखी कळविल्याचा त्यांचा दावा आहे.
विशेष म्हणजे, सन २०२४ च्या करारात Animal Birth Control Rules, 2023 ऐवजी रद्द झालेल्या २००१ च्या नियमांचा उल्लेख असल्याचाही आक्षेप घेण्यात आला आहे.
राठी यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून राज्यातील सर्व नगरपालिका-महानगरपालिकांतील या योजनेचे विशेष तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण करण्याची मागणी केली आहे. पुराव्यांशिवाय देयके मंजूर झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे















Total Users : 3307668