बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात बुलढाणा जिल्ह्यात आता मोठ्या आंदोलनाची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुधवार, 29 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिजामाता प्रेक्षागार येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जिल्हास्तरीय महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीने दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातील कलम 341 अंतर्गत अनुसूचित जातींना एकसंघ स्वरूपात घटनात्मक हक्क व आरक्षणाचे संरक्षण दिले. मात्र उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातींमध्ये फूट पाडून हे अधिकार कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप आयोजकांनी केला आहे. या निर्णयाला विविध अनुसूचित जाती समाजांचा तीव्र विरोध असून राज्य शासनाने उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी प्रमुख मागणी मोर्चातून करण्यात येणार आहे.
या महामोर्चात आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, खासदार चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार राजकुमार बडोले, आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह विविध समाजांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कृती समिती व आंबेडकरी समाजाने केले आहे.










