बुलढाणा (हॅलो बुलढाणा) TET अनिवार्यता, BLO-SIR कामाची सक्ती, संचमान्यतेचे अन्यायकारक धोरण, पदोन्नतीतील जाचक अटी आणि वेतनश्रेणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुलढाण्यात आज प्राथमिक शिक्षकांचा संताप रस्त्यावर उतरला. ‘सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती, जिल्हा बुलढाणा’ यांच्या वतीने गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
शिक्षकांच्या या एल्गारामुळे जिल्हा मुख्यालयात चांगलीच खळबळ उडाली. हातात फलक, घोषणाबाजी आणि मागण्यांचा ठाम आवाज घेऊन शिक्षकांनी शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. वारंवार सनदशीर मार्गाने निवेदने देऊनही शासनाने सकारात्मक भूमिका घेतली नाही, उलट शिक्षकांवर अतिरिक्त प्रशासकीय कामांचा बोजा टाकून अध्यापन प्रक्रियेलाच बाधा आणली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
शिक्षक संघटनांच्या म्हणण्यानुसार, शिक्षकांना BLO आणि SIR सारख्या निवडणूकसंबंधित कामातून पूर्णपणे मुक्त करावे, कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र TET परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी, पदवीधर व विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी लागू करावी, १५ मार्च २०२४ चे अन्यायकारक संचमान्यता धोरण रद्द करावे, तसेच पदोन्नती प्रक्रियेत सेवाज्येष्ठ शिक्षकांचा समावेश करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसाई परिवाराचे अध्यक्ष डी. एस. लहाने सर यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या सेवेसी सादर करण्यात आले.
मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समन्वय समितीने दिला आहे. त्यामुळे आता शासन शिक्षकांच्या या एल्गाराची दखल घेणार का, की संघर्ष आणखी पेटणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










