शेगाव (हॅलो बुलढाणा) रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे राष्ट्रीय पक्षी मोराचा जीव वाचल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. भुसावळ–बडनेरा मेमो पॅसेंजर शेगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की, रेल्वे इंजिनच्या समोरील भागात एक मोर अडकलेला आहे. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने आणि काळजीपूर्वक मोराला इंजिनच्या भागातून बाहेर काढले. सुदैवाने प्राथमिक तपासणीत मोराला गंभीर दुखापत झाली नसल्याचे आढळून आले. त्यानंतर पुढील उपचार व देखभालीसाठी मोराला वन्यजीव अभ्यासकांच्या ताब्यात देण्यात आले.
लोहमार्ग पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परता, संवेदनशीलता आणि भूतदयेच्या कृतीचे प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रीय पक्ष्याचा जीव वाचवून पोलिसांनी केवळ कर्तव्य बजावले नाही, तर माणुसकीचाही सुंदर आदर्श घालून दिला आहे.










