चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांना शिवीगाळ करून मारहाणीची उघड धमकी देणाऱ्या ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात पत्रकार संरक्षण कायद्यान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी चिखली तालुका पत्रकार संघ आक्रमक झाला आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ अंतर्गत चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी, 26 जून रोजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिखली पोलीस स्टेशनमार्फत निवेदन देण्यात आले.
खासदार संजय दिना पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या वादग्रस्त विधानाबाबत स्पष्टीकरण विचारले असता पत्रकारांना अर्वाच्य शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर “पुन्हा विचारायला आलात तर मारून पाठवीन” अशी थेट धमकी दिल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. हा प्रकार केवळ एका पत्रकाराचा अपमान नसून संपूर्ण पत्रकारितेवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि लोकशाही व्यवस्थेवर हल्ला असल्याची तीव्र भावना पत्रकारांमध्ये व्यक्त होत आहे.
पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी अस्तित्वात असलेल्या पत्रकार संरक्षण कायद्यानुसार संबंधित खासदाराविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे यांनी दिला. “पत्रकारांना धमकावणाऱ्यांना राजकीय पाठबळ मिळू नये. गुन्हा दाखल झाला नाही तर आंदोलनाची जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार संतोष लोखंडे, कैलास गाडेकर, रमाकांत कपूर, रविंद्र फोलाने, इफ्तेखार खान, महेश गोंधणे, छोटु कांबळे, भरत जोगदंडे, रमिझ राजा, कमलाकर खेडेकर, योगेश शर्मा, सय्यद साहिल, राजेश बिडवे, किरण शेजोळ, ऋषि भोपळे यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.











