spot_img
spot_img

१०० कोटींच्या नोटिशीवर आम. संजय गायकवाडांचा पलटवार! “आरोपांवर ठाम, न्यायालयात उत्तर देऊ”; असीम सरोदेंवरही सडकून टीका

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना वकील असीम सरोदे यांच्यामार्फत पाठवलेल्या १०० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीच्या नोटिशीनंतर बुलढाण्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. या नोटिशीवर आता आमदार संजय गायकवाड यांनी थेट पलटवार करत आपण केलेल्या आरोपांवर ठाम असल्याचा दावा केला आहे.

“नोटीस आली असेल तर आम्हीही न्यायालयीन मार्गानेच उत्तर देऊ. मी केलेल्या विकासकामांमुळे काही लोकांचा जळफळाट होत आहे. त्यातूनच अशा प्रकारच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत,” असे गायकवाड म्हणाले. विजयराज शिंदे यांच्यावर टीका करताना गायकवाड यांनी मोठा आरोप करत, “३५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी १० हजार कोटींची कमाई केली असेल, म्हणूनच माझ्यावर १०० कोटींचा दावा ठोकला असावा,” असा टोला लगावला.

याचवेळी शिंदे यांच्या आश्रमशाळेचा उल्लेख करत गायकवाड यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरूनही निशाणा साधला. “आदिवासी मुलांना उपाशी ठेवण्याच्या प्रकारावरून यापूर्वी अनेक मोर्चे निघाले होते,” असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, या प्रकरणात वकील असीम सरोदे यांच्या भूमिकेवरही गायकवाड यांनी जोरदार टीका केली. “प्रकाश आंबी प्रकरणापासून मला हे असीम सरोदे नावाचे भूत पाहायला मिळत आहे,” असे म्हणत त्यांनी सरोदेंवर सडकून प्रहार केला. त्यांच्या वक्तव्यामुळे आता हा वाद केवळ नोटिशीपुरता मर्यादित न राहता राजकीय आणि कायदेशीर संघर्षात रूपांतरित होण्याची चिन्हे दिसत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!