spot_img
spot_img

तब्येत बिघडली तरी थांबले नाहीत! कळपिरा धरणासाठी आमदार खरातांची आक्रमक भूमिका चर्चेत!

मेहकर (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील कळपिरा धरणाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, १९७८ साली बांधलेले हे जुने धरण आता अक्षरशः धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे चित्र निर्माण झाले आहे. धरणाच्या पिचिंग भागात सायाळ प्राण्यांमुळे २०० ते ३०० फूटांपर्यंत मोठमोठी बिळे व भगदाडे निर्माण झाल्याने पाण्याचा प्रचंड दाब वाढल्यास संभाव्य धोका अधिक गडद झाला आहे. हजारो एकर शेती, गावांचा संपर्क आणि नागरिकांचे जीवित या सर्वांवर थेट संकट निर्माण झाल्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

या गंभीर परिस्थितीत गावकऱ्यांचा आवाज थेट ऐकत आमदार सिद्धार्थ खरात यांनी आजारी अवस्थेतही कोणतीही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. तब्येत बिघडलेली असतानाही त्यांनी उपचारानंतर पुन्हा धरण परिसर गाठून संपूर्ण पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत धारेवर धरले.

धरणाची दुरवस्था पाहून त्यांनी जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने जागेवर बोलावून परिस्थितीची जाणीव करून दिली. भगदाडे तातडीने बुजवण्याचे आणि धरण मजबुतीकरणाचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

या वेळी निधीअभावी रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रस्ताव पाठवण्याचा निर्णयही घेण्यात आला. तसेच मतदारसंघातील इतर धरणे, पाझर तलाव व जलसाठ्यांच्या दुरुस्तीचाही व्यापक आराखडा तयार करण्याबाबत चर्चा झाली.

आमदार खरात यांनी ठामपणे सांगितले की, शेतकऱ्यांचा जीव आणि शेतीचे संरक्षण हेच माझे पहिले कर्तव्य आहे. कोणत्याही परिस्थितीत धरण सुरक्षित केले जाईल.यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी दिलीप निपाने, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग अमरावती येथील अधिकारी उपस्थित होते. तसेच सरपंच सुनील तांगडे, शेतकरी सुभाष तांगडे, प्रफुल्ल तांगडे, प्रमोद तांगडे, धनंजय तांगडे, राजू श्रीधर तांगडे, विलास तांगडे, समाधान सरदार आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या धाडसी भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, आ. सिद्धार्थ खरातांच्या तत्परतेचे व शेतकरीहिताच्या लढ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!