बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कारंजा येथील सूतगिरणी व्यवस्थापनाकडून चिखली येथील शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी चिखली पोलिसांवर संशयाची सुई फिरत आहे. दरम्यान एका राजकीय पुढाऱ्याने दबाव आणला असून याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बारकाईने लक्ष घालण्याची गरज आहे.
चिखली येथील महाराजा अग्रसेन खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीतून व्यापारी गोविंद अग्रवाल, दीपा अग्रवाल,अनुप अग्रवाल यांनी चिखलीमध्ये शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी करून तो कापूस वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील कापूस उत्पादक शेतकरी सहकारी सूतगिरणीकडे पाठवला होता.परंतु सदर सूतगिरणीच्या वतीने ठरल्याप्रमाणे या व्यापाऱ्यांना पैसे अदा केले नाहीत.यासंदर्भात महाराजा अग्रसेन कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी व्यापाऱ्यांचे पैसे मिळण्यासाठी पुढाकार घेतला. त्या वेळी सूतगिरणी व्यवस्थापनाने कापसाच्या गठानी या व्यापाऱ्यांना देऊन त्यांच्या मोबदल्याचा चुकारा करण्याचे आश्वासन दिले होते.या विषयाचे सेटलमेंट करण्यासाठी चिखलीतील एका राजकीय नेत्याच्या घरी एक बैठक पार पडली होती.अशोक अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन सूतगिरणीतून कापसाच्या गठानी परत आणल्या.परंतु त्यात अत्यंत निकृष्ट माल देऊन सूतगिरणी व्यवस्थापनाने व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. या चिखली पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केली. परंतु तात्काळ गुन्हा नोंद करून याची चौकशी करणे गरजेचे होते. मात्र, पोलिसांनी ‘तोंडावर बोट हाताची घडी’ केली.
▪️पोलिसांनी परस्पर प्रकरण केले खारीज!
सूतगिरणी प्रशासनाच्या वतीने गणेश प्रभाकर सुरंगलीकर यांनी चिखली पोलिसांकडे जी नोटरीची कागदपत्रे दिली त्या आधारावर चिखली पोलिसांनी हे प्रकरण परस्पर खारीज केले. सादर केलील्या कागदपत्रात बरेच घोळ असल्याचाही आरोप होत आहे.