बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्यातील विधान परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाताच बुलढाणा जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधून आमदारकीसाठी सध्या दोन दमदार चेहरे समोर आले आहेत अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेर काझी आणि खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा. तर दुसरीकडे भाजपकडून जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचे नावही चर्चेत येत असल्याने ही लढत अधिकच रंगतदार झाली आहे.
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग ॲड. नाझेर काझी यांची आमदारकी ही केवळ राजकीय नाही, तर सर्व धर्मियांच्या सामाजिक भावनांचा विषय बनली आहे. सिंदखेडराजा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यातील अठरापगड जातीतील कार्यकर्ते नाझेर काझी यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आपल्या दमदार वक्तृत्व, संघटन कौशल्य आणि निष्ठेच्या जोरावर काझी यांनी पक्षात वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, अजितदादांनी स्वतः “पुढची विधान परिषद तुमची” असा शब्द दिल्याची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात जोरात आहे. त्यामुळे “दादांचा शब्द” पाळला जाणार का? हा मोठा सवाल निर्माण झाला आहे.
दुसरीकडे, अनुभवी आणि राजकीय समीकरणांमध्ये पारंगत असलेले दिलीपकुमार सानंदा यांनी नुकतीच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्या नावालाही जोर आला आहे. जिल्ह्यातील समीकरणे जुळवून आणण्याची त्यांची ताकद त्यांना मजबूत दावेदार बनवत आहे.
विजयराज शिंदे यांचे नाव चर्चेत!
भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा सभागृहाच्या कामकाजाचा अनुभव असलेले ज्येष्ठ नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांचे नाव सध्या विधानपरिषदेच्या संभाव्य उमेदवारांमध्ये चर्चेत आले आहे.राजकीयदृष्ट्या सक्रिय आणि संघटनात्मक पातळीवर मजबूत पकड असलेल्या शिंदे यांच्या माध्यमातून पक्षाकडून राजकीय पुनर्वसन होऊ शकते, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगत आहे.
मात्र, अंतिम निर्णय हा पूर्णपणे पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेवर अवलंबून असून, येत्या काळात या चर्चेला अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










