बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आकर्षक पॅकेजिंग, मोठमोठे दावे आणि चमकदार जाहिरातींमागे लपलेला खाद्यपदार्थ कंपन्यांचा खोटेपणा आता उघड झाला आहे. ग्राहकांना एक दाखवून दुसरेच विकण्याचा घातक प्रकार राज्यभर समोर येत असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत राज्य सरकारने कठोर पाऊल उचलत अशा कंपन्यांवर तब्बल १० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे.
तपासणीत धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर दाखवलेले घटक प्रत्यक्षात अत्यल्प प्रमाणात किंवा नावापुरतेच असल्याचे उघड झाले आहे. ‘हेल्दी’, ‘नॅचरल’, ‘शुगर फ्री’ अशा भ्रामक दाव्यांमुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका वाढला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि चुकीची माहिती देणाऱ्या कंपन्यांना अजिबात सूट दिली जाणार नाही. ‘मिसब्रँडेड फूड’च्या नावाखाली चालणारा हा धंदा आता बंद केला जाणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई अटळ आहे.
दरम्यान, ‘हॅलो बुलढाणा’तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, खाद्यपदार्थ खरेदी करताना फक्त जाहिरातींवर विश्वास ठेवू नका. पाकिटाच्या मागील बाजूस दिलेली पोषणमूल्ये, घटक आणि उत्पादनाची तारीख नीट तपासा. संशयास्पद उत्पादने आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवा.
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची आता खैर नाही! सरकारच्या या निर्णयामुळे फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले असून, येणाऱ्या काळात अन्नसुरक्षेच्या बाबतीत मोठी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.










