खामगाव (हॅलो बुलढाणा) सर्वसामान्यांच्या चहाच्या कपासोबत जुळलेले बिस्कीट म्हणजे Parle‑G. पण याच लोकप्रिय बिस्किटाच्या उत्पादनाला आता बुलढाणा जिल्ह्यात ब्रेक लागला आहे. गॅसच्या तीव्र टंचाईमुळे खामगाव येथील ‘शिवांगी बेकर्स’ या कारखान्यातील उत्पादन गेल्या 11 मार्चपासून पूर्णपणे ठप्प झाले असून तब्बल 500 कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामांचा फटका आता थेट स्थानिक उद्योगांना बसू लागल्याचे चित्र आहे. खामगाव येथील ‘शिवांगी बेकर्स’ ही कंपनी देशभरात प्रसिद्ध असलेल्या Parle‑G बिस्किटांचे उत्पादन करते. मात्र व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर आलेल्या मर्यादांमुळे कंपनीला आवश्यक असलेला गॅस मिळत नसल्याने उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे थांबवावी लागली आहे.
या कारखान्यात दररोज सुमारे 80 टन बिस्किटांचे उत्पादन केले जात होते. त्यामध्ये जवळपास 60 टन ग्लुकोज बिस्किटे तर 20 टन क्रीम बिस्किटे तयार केली जात होती. मात्र बिस्किट तयार करण्यासाठी लागणारे ओव्हन पूर्णपणे गॅसवर चालत असल्याने गॅस पुरवठा खंडित होताच संपूर्ण उत्पादन बंद पडले आहे.
कंपनीचे संचालक अभय अग्रवाल यांनी सांगितले की, “आमचा प्लांट 11 मार्चपासून बंद आहे. कारखान्यासाठी दररोज सुमारे 3 टन गॅसची आवश्यकता असते. मात्र गॅस मिळत नसल्यामुळे दोन्ही उत्पादन लाईन थांबल्या आहेत. आमच्याकडे सुमारे 500 कामगार काम करतात, त्यामुळे उत्पादन लवकर सुरू झाले नाही तर कामगारांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळण्याची भीती आहे.”
दरम्यान, बिस्किट उत्पादन ही अत्यावश्यक सेवेशी संबंधित उद्योग असल्याने प्रशासनाने तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी कंपनी व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. अन्यथा खामगावातील या महत्त्वाच्या उद्योगावर गंभीर परिणाम होऊन शेकडो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










