बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पाऊस पडणे ही या निसर्गातली एक मोठी प्रक्रिया आहे. तो कधी रुसतो तर कधी धुवाधार पाऊस बरसतो..आपल्या गणिताप्रमाणे पडला
नाही की तो लहरी झालाय असे म्हणायला आपण मोकळे होतो. परंतु जीवनाचे दान पाऊसच देतो. काल रात्रीपासून बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरात पावसाची बॅटिंग सुरू आहे. खामगाव तालुका पाण्याखाली गेल्याने शेतजमिनीसह इतरही नुकसान झाले आहे.
खामगाव तालुक्यात रात्रीपासून झालेल्या दमदार पावसाने तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने अनेकांच्या जमिनी वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. काल रात्रीपासून जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. बऱ्याच ठिकाणी नदी – नाल्यांना पूर आल्याची माहिती मिळत आहे. यामध्येच खामगाव तालुक्यातील आवार, नागापूर या गावांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने तेथील ओढ्या नाल्याना पूर येऊन ओढ्या, नाल्याच्या काठाची शेकडो एक्कर शेती खरडून गेली आहे.नागापूर या गावात ओढ्याचे पाणी गावात शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे.विजेची डीपी ह्याही पाण्याखाली गेल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. या पावसामुळे कुठे नुकसान झाले आहे तर कुठे पिकांना संजीवनी मिळाली आहे.पावसाने अजूनही विश्रांती घेतलेली नाही.