बुलडाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका कंत्राटी चालकांनी तब्बल २१ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने तीव्र आक्रोश व्यक्त केला असून प्रशासनाविरोधात संतप्त भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करत चालकांनी मुख्यमंत्री सचिवालय आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदन सादर करून थकीत वेतन तात्काळ देण्याची मागणी केली.
सामान्य रुग्णालय बुलढाणा तसेच ग्रामीण रुग्णालयांत कार्यरत चालकांनी यापूर्वीही अनेकदा जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य सेवा उपसंचालकांकडे पाठपुरावा केला; मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणानंतर १५ दिवसांत वेतन देण्याचे तोंडी आश्वासन मिळाले होते, पण सात महिने उलटूनही परिस्थिती बदलली नसल्याने संताप वाढला आहे.
कामावरून कमी केलेल्या चालकांना पुन्हा नियुक्ती, थकीत वेतन त्वरित देणे आणि दर महिन्याचे वेतन पाच तारखेपूर्वी देण्याची मागणी करण्यात आली आहे. १० फेब्रुवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा देण्यात आल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे.










