डोणगाव/विठ्ठलवाडी (हॅलो बुलढाणा) शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेलेल्या पायी दिंडीतील एका तरुणाचा परतीच्या प्रवासात भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. महेश गजानन व्यवहारे (वय २५, रा. विठ्ठलवाडी) असे मृत तरुणाचे नाव असून तो महाराष्ट्र सुरक्षा बलात (MSF) जवान म्हणून कार्यरत होता.या घटनेने विठ्ठलवाडी गावावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी गुरुवारी चूल न पेटवता शोक व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी येथील ७० ते ८० भाविकांची पायी दिंडी २३ जानेवारी रोजी शेगावकडे रवाना झाली होती. २७ जानेवारी रोजी दर्शन आटोपून सायंकाळी सुमारे ५ वाजता सर्व भाविक ट्रॅक्टरमधून गावाकडे परतत होते. यावेळी शेगाव येथील आनंद सागर परिसरात ही दुर्घटना घडली.
प्रवासादरम्यान महेश व्यवहारे हा एका चालत्या ट्रॅक्टरवरून दुसऱ्या ट्रॅक्टरवर जाण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट धावत्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला.या भीषण अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सहकाऱ्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.










