बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघातातील निधनाच्या वृत्तानंतर बुलढाण्यात शोककळा पसरली असून, बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही बातमी ऐकल्यावर क्षणभर विश्वासच बसला नाही. महाराष्ट्राने एक अचूक, व वेळेवर निर्णय घेणारा नेता गमावला आहे, असे चांडक म्हणाले.
अजितदादांशी असलेल्या दीर्घ सहवासाचा उल्लेख करताना त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. माझा आणि अजितदादांचा सतत संपर्क होता. सहकार, साखर कारखाने, नगरपालिका निवडणूकी दरम्यान आणि अनेकदा वेगवेगळ्या विषयावर चर्चा व्हायची, असे त्यांनी सांगितले. एक प्रसंग सांगताना ते म्हणाले, “एकदा दादांचा हेलिकॉप्टर बिघाडामुळे अजितदादा तब्बल पाच तास सहकार शाळेत थांबले होते. साधेपणा आणि माणुसकी हेच त्यांचे मोठे वैशिष्ट्य होते.
चार दिवसांपूर्वीच फोनवर संवाद झाल्याचेही त्यांनी नमूद केले. मुंबईला भेटायला बोलावले होते. अशा क्षणी हे घडावे, हे अतिशय वेदनादायक आहे, असे ते म्हणाले.
अजितदादांसारखा नेता महाराष्ट्रात पुन्हा होणे कठीण आहे, अशा शब्दांत चांडक कुटुंबीय व बुलढाणा अर्बन परिवाराकडून त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.










