spot_img
spot_img

मोताळ्यात थरारक अपघात! तूर मळणीसाठी गेलेले ट्रॅक्टर उलटले, तरुणाचा जागीच मृत्यू

मोताळा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील सहस्त्रमुळी तांडा शिवारात ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना रविवार दिनांक १८ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

सध्या तूर मळणीचा हंगाम सुरू असून, मळणी यंत्र (थ्रेशर) जोडलेले ट्रॅक्टर (क्रमांक एमएच २८ एजे ७२१९) एका शेतातील तुरीची मळणी करून दुसऱ्या शेताकडे जात होते. शेतातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर आणि मळणी यंत्र अचानक उलटले. यावेळी ट्रॅक्टरखाली दबून सौरव हरिश्चंद्र जाधव (वय २२, रा. सहस्त्रमुळी) या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या अपघातात महेश मोतेसिंग जाधव (वय २०) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे. या अपघाताने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!