बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहर पोलिसांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत हरविलेले तब्बल ५४ मोबाईल फोन शोधून काढत ते मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. CENTRAL EQUIPMENT IDENTITY REGISTER (CEIR) या केंद्र शासनाच्या पोर्टलच्या माध्यमातून मागील एका महिन्यात ३८ मोबाईल हँडसेट शोधण्यात आले, तर तपासादरम्यान आणखी १६ मोबाईल हस्तगत करण्यात आले. विविध कंपन्यांचे हे सर्व मोबाईल अंदाजे १० लाख रुपयांच्या किमतीचे असल्याची माहिती आहे.
हस्तगत मोबाईलचे मालकी हक्क तपासून खात्री केल्यानंतर विशेष कार्यक्रमात मूळ मालकांना मोबाईल सुपूर्त करण्यात आले. यावेळी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, खामगावचे अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, Pro IPS अदित्य सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील तसेच बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवि राठोड उपस्थित होते.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रवि राठोड, पोउपनि. रवि मोरे, पोलीस अंमलदार युवराज शिंदे, दिपक चव्हाण, विनोद बोरे, मनोज सोनुने व महिला पोलीस अंमलदार मोहिनी चव्हाण यांनी यशस्वीपणे पार पाडली. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.










