संग्रामपूर (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील कोद्री गावात जागेच्या किरकोळ वादातून दिलेल्या जिवे मारण्याच्या धमकीमुळे एका 45 वर्षीय मजुराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जितेंद्र श्रीराम वानखडे असे मृतकाचे नाव असून या प्रकरणी केशव गोपीचंद वानखडे (वय 55, रा. कोद्री) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मृतकाचे वडील श्रीराम वानखडे यांनी तेल्हारा पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात नमूद केल्यानुसार, केशव वानखडे हा 14 डिसेंबर 2025 रोजी कु-हाड घेऊन घरासमोर आला व जागेच्या वादावरून शिवीगाळ करत “तुला संपवून टाकतो, जिवानिशी मारतो” अशी थेट धमकी दिली. या घटनेनंतर जितेंद्र मानसिकदृष्ट्या भयभीत होऊन घर सोडून निघून गेला.
नातेवाइकांकडे गेला असताना देखील त्याने जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. अखेर 7 जानेवारी 2026 रोजी टाकळी गावाजवळ शेतात त्याचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
आधीपासून दोन्ही कुटुंबांत तक्रारी, विनयभंगाचे गुन्हे दाखल असताना पोलिसांनी वेळीच ठोस कारवाई का केली नाही, असा संतप्त सवाल नातेवाइकांनी उपस्थित केला आहे











