मलकापूर (हॅलो बुलडाणा) शहरात फर्निचर कंत्राटाच्या नावाखाली मोठा आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून, स्थानिक व्यापाऱ्याची तब्बल 2 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याने खळबळ उडाली आहे. मलकापुर येथील यशोधाम परिसरात राहणारे हॉटेल व्यावसायिक मंगलसिंग गोपालसिंग राजपूत यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ब्राम्हण सभा, बुलढाणा रोड येथील घराच्या फर्निचर कामासाठी अकोला येथील मनिषकुमार मांडिवाल व किशोर अंधारे या दोन ठेकेदारांना काम देण्यात आले होते. संबंधित ठेकेदारांना आतापर्यंत तब्बल 13 लाख रुपये देण्यात आले होते. मात्र, 7 ऑक्टोबर 2025 रोजी हे ठेकेदार मजुरांसह अर्धवट काम सोडून पळून गेल्याचे निदर्शनास आले.
पलायन करताना त्यांनी आयका कंपनीचे 4 सीलर (80 हजार रुपये) व किचन रॅकचे ट्रेचे फर्निचर (2 लाख रुपये) असा एकूण 2.80 लाख रुपयांचा माल लंपास केल्याचा आरोप आहे. वारंवार संपर्क साधूनही काम पूर्ण न करता उलट मध्यस्थीद्वारे पुन्हा 95 हजार रुपये घेण्यात आले.अखेर ठेकेदारांनी काम न करता व मौल्यवान साहित्य परत न करता विश्वासघात केल्याने पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून, अशा ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.











