बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणाई हवालदिल झाली असताना, शिरपूर येथे उद्या एक ऐतिहासिक पाऊल उचलले जात आहे. माँ जिजाऊ चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवार, १८ जानेवारी रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यात तब्बल ३२०० हून अधिक पदांसाठी थेट भरती होणार आहे. बेरोजगार युवक-युवतींसाठी ही सुवर्णसंधी ठरणार असून, रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या तरुणांसाठी हा मेळावा आशेचा किरण ठरणार आहे.
या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते होणार असून, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. नगर परिषद बुलढाणाचे गटनेते मृत्युंजय गायकवाड, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश बिटोडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती या मेळाव्याला लाभणार आहे.
शिरपूर, साखळी, येळगाव, अजिसपूर परिसरातील सरपंचांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित करते.
हा रोजगार मेळावा केवळ नोकरी देणारा नाही, तर तरुणांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन माँ जिजाऊ चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी तायडे व सचिव सरला तायडे यांनी केले आहे.











