मेहकर (हॅलो बुलडाणा) शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर असताना आणि सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन शहराला घेरत असतानाच, नवोदित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी सत्तेत येताच थेट मैदानात उडी घेत धडाकेबाज निर्णय घेतला. संक्रांत सणाच्या दिवशीही कुठलीही तडजोड न करता रात्री साडेनऊ वाजता नगरपरिषदेचे दालन उघडत घेतलेली तातडीची बैठक म्हणजे प्रशासनाला दिलेला स्पष्ट इशाराच ठरला.
१ डिसेंबरपासून पगार रखडणे, वेतनात कपात, वेळेवर पगार न मिळणे तसेच हातमोजे, सॅनिटायझर, बूट यांसारखी मूलभूत सुरक्षा साधने न दिल्याने संतप्त सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. परिणामी शहरातील स्वच्छता पूर्णपणे धोक्यात आली होती. मात्र नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता स्वतः पुढाकार घेत थेट कामगारांशी संवाद साधला.
तुमचे आरोग्य आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे. तुम्हाला काही झाले तर तुमचे कुटुंब उघड्यावर पडेल. अशा हलगर्जीपणाला अजिबात माफी नाही, असे ठाम शब्दांत सुनावत गारोळे यांनी प्रशासन व कंत्राटदारांना स्पष्ट इशारा दिला. १५ जानेवारी रोजीच सर्व सफाई कामगारांच्या खात्यात पगार जमा होईल, असे ठोस आश्वासन देत त्यांनी कामगारांचा विश्वास संपादन केला. तुम्हीही या नगरपरिषदेचे नगराध्यक्षच आहात. कुठलीही अडचण असली तर रात्री १ वाजताही माझा दरवाजा खुला आहे, या शब्दांनी वातावरणच बदलून गेले.
या ठाम भूमिकेनंतर टाळ्यांच्या कडकडाटात सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन मागे घेतले. दरम्यान, यापुढे कंत्राटदाराकडून कुठलीही हलगर्जी झाली तर थेट कंत्राट रद्द केले जाईल, असा थेट इशारा नगराध्यक्ष गारोळे यांनी दिला. कामबंद मोडीत काढत जनतेच्या प्रश्नांवर तडाखेबंद निर्णय घेणारे किशोर गारोळे हे शहराच्या राजकारणात ‘अॅक्शन मोड’मध्ये उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.











