लोणार (हॅलो बुलडाणा) जागतिक वारसा दर्जा लाभलेल्या लोणार सरोवरातील पाणीपातळी अचानक वाढल्याने संपूर्ण प्रशासन सतर्क झाले आहे. या गंभीर आणि संवेदनशील बदलामागचे नेमके कारण शोधण्यासाठी आता राज्य शासनाने थेट शास्त्रीय पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. अमरावती विद्यापीठ आणि आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांच्या संयुक्त अभ्यासाचा तब्बल ५० लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून, यामुळे लोणारच्या भवितव्याला दिशा मिळण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आयआयटीचे नामवंत तज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्याशी थेट चर्चा करत संशोधनाला गती दिली. डॉ. काकोडकर यांच्या नेतृत्वाखालील टीमने लोणार सरोवराची प्रत्यक्ष पाहणी करत प्राथमिक अभ्यास केला असून, १५ ते २० अत्याधुनिक प्रयोगशाळांच्या माध्यमातून पाणी, भूगर्भ, हवामान, रसायनशास्त्र व जैवविविधतेचा सखोल वेध घेतला जाणार आहे.
प्राथमिक निष्कर्षानुसार वाढलेला पाऊस, भूगर्भजल पुनर्भरण आणि हवामान बदलामुळे पाणीपातळी वाढत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ठोस निष्कर्षासाठी सखोल संशोधन अपरिहार्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.











