बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नगरपालिकेतील राजकारणात आज मोठी घडामोड घडताना दिसत असून उपनगराध्यक्ष पदी गजेंद्र दांदडे यांची सर्वानुमते निवड जवळपास निश्चित झाली आहे आज उपनगराध्यक्ष पदासाठी अधिकृत निवडणूक प्रक्रिया पार पडत असून, काही क्षणांतच नावाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. नगरपालिकेच्या सभागृहात सध्या सत्ताधारी शिवसेनेची ठाम पकड दिसून येत आहे.
या महत्त्वपूर्ण निवड प्रक्रियेसाठी नगराध्यक्ष पुजाताई संजय गायकवाड, नगरपालिकेतील गटनेते मृत्युंजय गायकवाड तसेच शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित राहून आपली ताकद दाखवत आहेत. एकसंघ शिवसेना, शिस्तबद्ध मतदान आणि आधीच ठरलेली रणनीती यामुळे दांदडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गजेंद्र दांदडे यांनी यापूर्वी पाणीपुरवठा सभापती पद भूषविताना कार्यक्षम व आक्रमक प्रशासकीय भूमिका घेतली होती. पाणीप्रश्न, नागरिकांच्या तक्रारी आणि कामातील गती यामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यामुळेच उपनगराध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव पुढे आल्याचे बोलले जात आहे.











