डोणगाव (हॅलो बुलडाणा /अनिल राठोड) शहरात गुन्हेगारी वृत्ती पुन्हा एकदा उफाळून आली असून, मध्यरात्री भरवस्तीत उभ्या असलेल्या वाहनावर हल्ला करून अज्ञातांनी दहशत माजवली आहे. आरेगाव रोड परिसरातील रहिवासी मनोज काळे यांच्या मालकीच्या सुप्रो वाहनाची समोरील काच फोडून आरोपींनी थेट कायदा-सुव्यवस्थेलाच आव्हान दिले आहे.
सोमवारी मध्यरात्री सुमारे १:४५ वाजताच्या सुमारास स्कुटीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गाडीसमोर थांबून दगडाने जोरदार प्रहार केला. क्षणार्धात वाहनाची समोरील काच पूर्णपणे फुटली आणि आरोपी घटनास्थळावरून पोबारा करून पसार झाले. विशेष म्हणजे ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.
मुख्य रस्त्यावर आणि घनवस्तीत अशा प्रकारे निर्ढावलेपणाने करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपींना कायद्याची भीती उरली नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे डोणगावच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. मात्र, नागरिकांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.











