चिखली (हॅलो बुलडाणा) येथील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात दलालांचा उघड उच्छाद सुरू असल्याचा गंभीर आरोप भूकरमापक अभय रमेश पाटील यांनी केला असून, या प्रकरणाने महसूल प्रशासनातील सडलेली यंत्रणा पुन्हा एकदा उघडी पाडली आहे. तब्बल ८ वेळा तक्रारी करूनही कारवाई शून्य असल्याने प्रशासन नेमके कुणाच्या दबावाखाली आहे, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
कार्यालयात दिवसभर ठाण मांडून बसणारे दलाल शेतकरी व दिव्यांग नागरिकांना बसायला जागा देत नाहीत, कर्मचाऱ्यांच्या खुर्च्यांवर बसतात, अभिलेख कक्षात बिनधास्त प्रवेश करतात ही धक्कादायक बाब तक्रारीत नमूद आहे. मोजणी व नकाशा कामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून कार्यालयाच्या नावाने पैसे उकळले जात असल्याचा आरोप असल्याने विभागाची प्रतिमा मलीन होत आहे.
दिनांक २९/११/२०२४ रोजी दलालांकडून फोनवर धमक्या, कार्यालयात वादविवाद, आमदारांचे नाव वापरून राजकीय दबाव हे सर्व प्रकार घडूनही संबंधितांवर एकही ठोस कारवाई नाही. उलट तक्रारदार अधिकारी अभय पाटील यांनाच त्रास देण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे. तीन पदांचा एकाच वेळी पदभार, कारणे दाखवा नोटिसा हा सारा प्रकार म्हणजे दलालांना मोकळे रान आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांना दडपशाही नव्हे काय?
या गैरप्रकारांबाबत वर्तमानपत्रांत वारंवार बातम्या येऊनही वरिष्ठ अधिकारी गप्प का? ‘आपले सरकार’ पोर्टलवरील तक्रारी मोघम उत्तर देऊन निकाली काढल्या जात असतील तर ही संगनमताचीच कबुली नाही का, असा सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे थेट तक्रार दाखल झाल्याने आता तरी दलालमुक्त कार्यालयासाठी कठोर कारवाई होणार का, की पुन्हा एकदा प्रकरण दडपले जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.











