बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भारताला आत्मनिर्भर, स्वावलंबी व पूर्ण विकसित राष्ट्र बनविण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या स्वदेशी जागरण मंचतर्फे राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भव्य स्वदेशी संकल्प दौड / मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांमध्ये स्वदेशीभाव, राष्ट्रभक्ती व आर्थिक स्वावलंबनाचा आत्मविश्वास जागृत करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वदेशी जागरण मंच १९८५ पासून देशभरात कार्यरत असून, २०२० पासून स्वदेशी सुरक्षा स्वावलंबी भारत अभियान राबविले जात आहे. याच अभियानांतर्गत १२ जानेवारी रोजी युवक-युवतींसाठी ही प्रेरणादायी मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. स्पर्धा गोपाल आश्रम, धाड नाका ते अंजिठा रोड, बुलढाणा या मार्गावर सकाळी ६.३० वाजता होणार असून २.५ किमी जाणे व २.५ किमी येणे अशी एकूण ५ किमी अंतराची दौड असेल.
ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली असून प्रवेश पूर्णतः मोफत आहे. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन स्वदेशी जागरण मंच, बुलढाणा आयोजन समितीने केले आहे.











