बुलढाणा (हॅलो बुलडाणा) गरीब, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आला असून, शासकीय सेवेत असतानाही योजनेचा लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची गाज कोसळण्याची चिन्हे आहेत.
शासनाकडून महिला व बालकल्याण विभागाला विविध विभागात कार्यरत असलेल्या १९६ शासकीय कर्मचाऱ्यांची संशयास्पद यादी प्राप्त झाली होती. या यादीच्या आधारे सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत १९० कर्मचारी अर्धवेळ सेवेत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असल्याने ते पात्र ठरले, मात्र उर्वरित ६ पूर्णवेळ शासकीय कर्मचाऱ्यांनी थेट शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
या सहा कर्मचाऱ्यांनी नियम झुगारून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी १६ हजार ५०० रुपये याप्रमाणे एकूण ९९ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. इतक्यावरच न थांबता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
लवकरच या प्रकरणात निलंबन, वेतनवाढ रोखणे किंवा इतर कठोर शिक्षेची शक्यता वर्तवली जात आहे. गरजू महिलांसाठी असलेल्या योजनेचा गैरवापर करणाऱ्यांना शासनाने दिलेला हा इशारा असून, सरकारी योजनांमध्ये फसवणूक केल्यास कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही हे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.लाडकी बहीण योजनेचा लाभ बेकायदेशीरपणे घेणे या कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले असून, पुढील दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.











