बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात दहशत निर्माण करणाऱ्या संघटीत गुन्हेगारी टोळ्यांवर अखेर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत मोठी आणि कडक कारवाई करण्यात आली आहे. मलकापूर शहरात खून, दरोडा, जबरी चोरी, हल्ले यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांच्या जिवितास व मालमत्तेस धोका ठरणाऱ्या टोळीवर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
MIDC मलकापूर पोलीस स्टेशन येथे दाखल अप.क्र. 138/2025 मध्ये किरकोळ वादातून संघटीतपणे केलेल्या निर्घृण हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला होता. सतीश गजानन झाल्टे (रा. पिंप्राळा) याचा पोटात चाकूने वार करून खून करण्यात आला होता, तर साक्षीदारांवरही अमानुष मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींविरोधात यापूर्वीही खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर निर्णय घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी प्रस्ताव सादर केला. त्यास विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे (अमरावती परिक्षेत्र) यांनी मंजुरी देत एकूण 9 आरोपींवर मकोका लावण्याचे आदेश दिले. यामध्ये संकेत सुनिल उन्हाळे, साहिल पालवे, देव राजपूत, अरविंद उर्फ गबया साळुंके यांच्यासह दोन फरार आरोपींचा समावेश आहे.
नववर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा कडक संदेश स्पष्ट झाला आहे. संघटीत गुन्हेगारीला कायमचा आळा घालण्याच्या दिशेने ही कारवाई मैलाचा दगड ठरणार आहे.











