बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भारतीय जनता पार्टी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गत सार्वत्रिक नगर परिषद बुलढाणा निवडणूक 2025 दरम्यान पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार केल्याचा ठपका ठेवत भाजपा बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष श्री उदय देशपांडे यांना तात्काळ पदमुक्त करण्यात आले आहे.
भाजपा नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्पिता विजयराज शिंदे, बुलढाणा शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांच्या पत्नी सौ. सरला मंदार बाहेकर तसेच भाजपा नगरसेवक पदाच्या उमेदवारांविरोधात देशपांडे यांनी उघडपणे पक्षविरोधी प्रचार केल्याच्या गंभीर तक्रारी पक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या. याबाबत सखोल चौकशी केली असता तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट झाले.
या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल भाजपा प्रदेश अध्यक्ष मा. आ. रविंद्रजी चव्हाण, प्रदेश संघटन मंत्री आ. रणधीरजी सावरकर, विदर्भ प्रदेश संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर आणि भाजपा बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा. आ. विजयराजजी शिंदे यांच्याकडे सादर करण्यात आला. वरिष्ठांच्या स्पष्ट अनुमतीनंतर 31 डिसेंबर 2025 रोजी देशपांडे यांना जिल्हा उपाध्यक्ष पदावरून तात्काळ हटविण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला.
इतकेच नव्हे, तर पुढील आठ दिवसांत पक्षविरोधी कारवायांबाबत समाधानकारक खुलासा न केल्यास पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली जाणार असल्याचा थेट इशाराही देण्यात आला आहे.
उदय देशपांडे म्हणाले….मी अगोदरच
बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीशी संबंधित अपरिहार्य कारणांमुळे मी भारतीय जनता पार्टीचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष उदय भास्करराव देशपांडे आपल्या पदाचा राजीनामा अगोदरच दिला आहे. त्यांनी विदर्भ प्रांत संघटन मंत्री उपेन्द्रजी कोठेकर यांच्याकडे लेखी राजीनामा सादर केला असून, याची प्रत पक्षातील वरिष्ठ नेत्यांना पाठविण्यात आली आहे.











