बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भारतरत्न, माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बुलढाणा शहरात त्यांच्या स्मृती जपण्यासाठी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस दत्ता पाटील यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शहरातील स्टेट बँक चौक / तहसील चौकास ‘अटल बिहारी वाजपेयी चौक’ असे नामकरण करण्याची तसेच शहरातील प्रमुख मोकळ्या जागेतील उद्यानास ‘अटल उद्यान’ किंवा ‘अटल वन’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात अटल बिहारी वाजपेयी यांनी संपूर्ण आयुष्य देशसेवा, सुशासन, मजबूत व आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी समर्पित केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांची राजकीय नीती, मूल्यनिष्ठा, विचारसरणी व राष्ट्रप्रेम येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांच्या कार्याची आठवण कायमस्वरूपी जिवंत ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
या मागणीस चंद्रकांत बरदे, दत्ता शिंदे, मुन्ना बेंडवाल, विश्राम पवार, करपे, पंकज गायकवाड, सुनील जवंजाळ आदींचा पाठिंबा असून नागरिकांमधूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.











