बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बँकांमध्ये वर्षानुवर्षे पडून असलेल्या दावा न केलेल्या ठेवींवर अखेर हालचाल सुरू झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 36 हजार 17 खातेदारांच्या 48 कोटी 72 लाख रुपयांच्या बेवारस ठेवी परत मिळविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवार, 29 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन भवन, बुलढाणा येथे भव्य विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
10 वर्षांहून अधिक काळ बँक खाते, पेंशन, विमा, शेअर्स, म्युच्युअल फंड आदी ठिकाणी पडून असलेल्या आणि व्यवहार न झालेल्या रकमेबाबत या शिबिरात थेट मार्गदर्शन करण्यात येणार आहे. खातेदार किंवा त्यांचे कायदेशीर वारस यांना आपली हक्काची रक्कम परत मिळविण्याची ही मोठी संधी आहे.
नागरिकांनी उद्यम पोर्टल किंवा संबंधित बँक व वित्तीय संस्थांच्या संकेतस्थळावर तात्काळ आपले नाव तपासावे आणि आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या बँक शाखेत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोट्यवधी रुपये निष्क्रिय खात्यांत पडून राहू देऊ नका आपल्या हक्काच्या पैशासाठी आता पुढे या असे आवाहन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक यांनी केले आहे.











