चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) सामान्य नागरिकांच्या तक्रारी धूळखात पडू न देता त्या वेळेत व प्रभावीपणे निकाली काढण्याचा निर्धार चिखली पोलिसांनी कृतीतून दाखवून दिला आहे. मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून दिनांक २४ ते २७ डिसेंबर २०२५ दरम्यान चिखली पोलीस ठाण्यात आयोजित विशेष तक्रार निवारण शिबिराने नागरिकांमध्ये आशेचा नवा किरण निर्माण केला आहे.
या चार दिवसीय शिबिरात नागरिकांच्या विविध स्वरूपाच्या तक्रारी थेट ऐकून घेत कायदेशीर चौकटीत तातडीची कारवाई करण्यात आली. कौटुंबिक वाद, जमीन-विवाद, फसवणूक, सायबर गुन्हे, महिला तक्रारी तसेच किरकोळ वाद यांसारख्या संवेदनशील विषयांवरील अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल झाले. विशेष म्हणजे अनेक प्रकरणांमध्ये समुपदेशनाद्वारे तडजोड घडवून आणत नागरिकांचे प्रश्न जागेवरच मार्गी लावण्यात पोलिसांना यश आले, तर गंभीर स्वरूपाच्या तक्रारींवर गुन्हे दाखल करून पुढील कायदेशीर प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात आली.
आजपर्यंत या शिबिराच्या माध्यमातून तब्बल ३२९ नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होऊन ३२९ तक्रारींचे यशस्वी निराकरण करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर चिखली पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दाखल असलेल्या एकूण १०४० गुन्ह्यांपैकी ९६० गुन्हे न्यायालयात दाखल करून न्यायप्रविष्ठ करण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
तक्रारदारांच्या अडचणी समजून घेत त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यावर भर देण्यात येत असून, नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय आपल्या तक्रारी थेट पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात. अशी शिबिरे नियमितपणे आयोजित केली जातील, असे ठाम आवाहन पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांनी केले आहे.
मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, मा. अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात चिखली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी या शिबिराची प्रभावी अंमलबजावणी करीत आहेत











