बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात शासकीय पद,राजकीय सत्तेची जवळीक आणि पोलिसांची उदासीनता यांच्या जोरावर न्यायप्रविष्ट शेतजमीन बळकावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुलडाणा शहरापासून 12 किमी वर असंलेले मौजे डोंगरखंडाळा येथील गट नं. १७५ (११.३१ आर) ही शेतजमीन उपजिल्हाधिकारी भूसंपादन–२६ पुणे व मंत्री ओएसडी पदावर कार्यरत सिध्दार्थ वसंता भंडारे याने पदाचा गैरवापर करून हडपल्याचा गंभीर आरोप शेतकरी राहुल मिननाथ तारे यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे.
लोकतंत्र सेनानी असलेल्या वडिलांच्या काळापासून तारे कुटुंबाच्या ताब्यात असलेली ही जमीन वारस नोंदी अपूर्ण असल्याने आणि प्रकरण न्यायालयात (लिस पेंडन्सी क्र. ४३३९/२०२३) प्रलंबित असतानाही, कोणतीही नोटीस न देता मोजणीचा घाट घालण्यात आला. पुढे थेट मावसभाऊच्या नावाने खरेदीदस्त करून,गहाण असलेली जमीन निबंधक कार्यालयातील त्या साखळीतील संबंधित काही अधिकाऱ्यानी संगनमताने नोंदविल्याचा आरोप तारे परिवाराने केला आहे.
या प्रकरणात हरकती,अपील, पोलिस तक्रारी करूनही प्रशासनाने डोळेझाक केली.कळस म्हणजे २ जुलै २०२५ रोजी जेसीबी, ट्रक, ट्रॅक्टर, बाऊंसर व जमाव घेऊन पेरलेल्या शेतात बळजबरी घुसखोरी, नासधूस, सिमेंट खांब गाडून तार कंपाऊंड व टिनशेड उभारण्यात आले. तक्रार घेण्यास ही पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप असून ई-मेलने तक्रार द्यावी लागली.न्यायप्रविष्ट प्रकरणातही अतिक्रमणास मूक संमती? पोलिस बंदोबस्त नाकारला असताना ही दादागिरी कशी? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री सचिवालयात वारंवार अर्ज करूनही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. “ओएसडी पदाचा गैरवापर करून जमीन हडपणाऱ्या ‘भूमाफिया’वर तात्काळ कठोर कारवाई करा आणि जमीन परत मिळवा,” अशी थेट मागणी तक्रारदाराने दिलेल्या अर्जात केली आहे.
क्रमशः











