चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) तालुक्यातील मौजे येवता येथे आज दिनांक 17/12/2025 रोजी दुपारी साडेएक वाजताच्या सुमारास बिबट्याने थेट शेतात घुसून शेतकऱ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वतःच्या शेतात काम करीत असताना श्री. डीगांबर गोविंदा घेवंदे (रा. येवता) यांच्यावर अचानक बिबट्याने झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हल्ल्यात श्री. घेवंदे हे जखमी झाले असून त्यांना तत्काळ सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे दाखल करण्यात आले. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून तब्येत चांगली असल्याची माहिती आहे. मात्र, हा केवळ नशीबाचा भाग म्हणावा लागेल पण पुढील वेळी असा हल्ला जीवघेणा ठरू शकतो, याची जबाबदारी कोण घेणार?
ग्रामीण भागात बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असताना वनविभाग आणि प्रशासन नेमके काय करत आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. याआधीही परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना घडूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. शेतकरी रोज जीव मुठीत धरून शेती करणार का? वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, पिंजरे लावावेत आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. दरम्यान, सर्व शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.










