संग्रामपूर (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अक्षरशः कोलमडली असून आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांच्या जीवाशी उघडपणे खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल वसाली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व आवश्यक कर्मचारी नसल्याने संपूर्ण आरोग्य केंद्राची जबाबदारी चक्क दोन परिचारक/शिपायांवर सोपवण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.
विशेष म्हणजे या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन होऊन अवघे एक वर्षही पूर्ण झालेले नाही. कोट्यवधींचा निधी खर्च करून उभारलेल्या इमारतीत ना डॉक्टर, ना आरोग्य सेविका, ना अधिकारी आदिवासी रुग्णांची तपासणी, औषधोपचार आणि प्राथमिक उपचार हे सर्व काम दोन शिपाई करत असल्याचं वास्तव अंगावर काटा आणणारं आहे. ही केवळ निष्काळजीपणा नसून थेट गुन्हेगारी दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे.
याहून धक्कादायक बाब म्हणजे या आरोग्य केंद्राच्या परिसरात लाखो रुपयांचा वैध आणि मुदत न संपलेला औषध साठा जाळण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ही औषधे कोणी, कशासाठी आणि कोणाच्या आदेशाने जाळली? यामागे भ्रष्टाचार आहे की पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न? याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाकडे विचारणा केली असता आरोग्य अधिकारीच गैरहजर असल्याचे उघड झाले.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातच जर आदिवासींच्या आरोग्याची ही अवस्था असेल, तर राज्यातील इतर दुर्गम भागांची परिस्थिती काय असेल? आरोग्य मंत्री यावर उत्तर देतील का? दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून निलंबन होणार का, की पुन्हा एकदा फाईली धूळ खात पडून राहणार? आदिवासींचे जीव स्वस्त नाहीत! बुलढाण्यातील या आरोग्य घोटाळ्यावर तात्काळ चौकशी, जबाबदारी निश्चिती आणि कठोर कारवाई झालीच पाहिजे.अन्यथा हा अन्याय अधिक गडद होणार, हे निश्चित










