जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) उटी बु. गावात मध्यरात्री हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. सततच्या वादातून उद्भवलेल्या रागाच्या भरात पतीने झोपलेल्या पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतक महिला लक्ष्मी पवन धुंदाळे (वय 24) असून आरोपी तिचा पती पवन गजानन धुंदाळे (वय 28) आहे.
ही घटना आज (दि. 08 डिसेंबर) पहाटे अंदाजे 12.30 वाजता उटी बु. येथे घडली. पीडितेचे सासरे गजानन धुंदाळे आणि सासू पुष्पा हे रात्री 1 वाजता धाव घेत पोलीस पाटील संदीप गटमणे यांच्या घरी आले व “पवनने लक्ष्मीला कुऱ्हाडीने मारले” अशी थरारक माहिती दिली. तत्काळ पोलीस पाटील घटनास्थळी पोहोचले असता लक्ष्मी ही खोलीतील बिछान्यावर रक्ताच्या थारोळ्यात निपचित अवस्थेत आढळली. मानेच्या मागील बाजूस खोल जखम होती व बिछाना पूर्ण रक्ताने माखलेला होता.
घटनास्थळी उपस्थित आरोपी पवन याने धक्कादायक कबुली दिली. “लक्ष्मी मला नेहमी तू काही कामाचा नाहीस, कुठे जाऊन मर असं बोलून अपमान करायची. काल रात्रीही तिने शिविगाळ केली.रागाच्या भरात मी तिला झोप लागल्यानंतर कुऱ्हाडीने वार केला,” असे पवनने पोलीस पाटीलांना सांगितले.
माहिती मिळताच पोलीस, अॅम्बुलन्स आणि डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टरांनी तपासून लक्ष्मीचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. दांपत्याला सात महिन्यांची श्रेया नावाची मुलगी आहे. या अमानुष कृत्याने गावात शोककळा पसरली असून पवन धुंदाळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.










