बुलडाणा (हॅलो बुलडाणा) अवैध वाळू माफियांना शह देण्यासाठी महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा जोरदार कारवाई करत, मंगळवारी मध्यरात्री शहरात धडाकेबाज ऑपरेशन केले. घाटाकडून येणाऱ्या अवैध वाळूच्या टिप्परांवर लगाम घालण्यासाठी तयार असलेल्या पथकाला एका टिप्पर चालकाने अक्षरशः नाकी नऊ आणले. मात्र महसूलच्या पथकाने हार न मानता अखेर टिप्पर जप्त करून बुलडाणा शहर ठाण्यात लावला.
प्राप्त माहितीनुसार, 2 डिसेंबर रोजी नगरपरिषद निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर सर्व अधिकारी थकलेले असतानाच तहसीलदार विठ्ठल कुमरे यांना गुप्त माहिती मिळाली की मलकापूर रोडने अवैध वाळू घेऊन टिप्पर शहरात घुसणार आहे. कुमरे यांनी तत्काळ मंडळ अधिकारी अशोक शेळके, तलाठी गोपाल राजपूत, अतुल झगरे आणि शासकीय वाहन चालक अशोक देवकर यांचे पथक जयस्तंभ चौकात रवाना केले.
रात्री 10.30 च्या सुमारास एमएच-28-बीबी-7983 हा टिप्पर दिसताच त्याला थांबवण्याचा प्रयत्न झाला; पण चालकाने थेट धाडच्या दिशेने सुसाट वेगाने पळ काढला. महसूल पथकानेही हार न मानता वेगात पाठलाग करून सागवनजवळ टिप्पर रोखले. रॉयल्टीची विचारणा केली असता कागदपत्रे नसल्याचे उघड झाले. टिप्पर ठाण्यात नेण्याचे आदेश दिले असता चालकाने बुलडाणा–धाड महामार्गावरच वाळू रस्त्यात खाली टाकून पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला!
महसूल पथकाने तातडीने पुन्हा पाठलाग सुरू केला आणि अखेर कोलवड गावातील महादेव मंदिराजवळ टिप्पर सोडून चालक अंधारात पसार झाल्याचे आढळले. टिप्पर जप्त करून तो शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. रस्त्यात टाकलेली वाळू एका जेसीबी चालकाने विनाअनुमती बाजूला करत असल्याने त्याची जेसीबीही जप्त केली आहे.टिप्पर मालक अमोल सुशिर (रा. मलकापूर) याच्यावर कडक दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी आज दिली.












