बुलढाणा (हॅलो बुलडाणा) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जोर वाढत असतानाच बुलढाण्यात राजकीय तापमान अचानक उसळले आहे.शहरातील विकासा वरून काँग्रेसच्या नगरसेवक पदाचे उमेदवार वसीम शेख यांनी सरळ आमदार संजय गायकवाडांवर थेट निशाणा साधत प्रहारांचा तगडा मारा केला आहे. शहरात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या ‘डिफेंडर गाडी’ प्रकरणावरून वसीम शेख यांनी आमदारांना माध्यमांसमोर चव्हाट्यावर आणले आहे.
झालं ते सर्वांना माहिती आहे, सर्वश्रुत आहे! कोणाचा विकास झाला? कुणाकडे डिफेंडर आली? जर ती ठेकेदाराच्या नावावर होती तर त्या गाडीवर MLA चा सिम्बॉल कसकाय? असा थेट सवाल वसीम शेख यांनी उपस्थित केला. यासोबतच आमदारांच्या स्टिकरसाठी नियम आहेत. इतके आमदार बघितले, पण कोणालाही स्टिकर गाडीवर लावताना पाहिलं नाही. मी स्वतः गायकवाडांना याबाबत प्रश्न विचारला होता, असा दावा करत शेख यांनी वातावरणात खळबळ उडवली.
स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या विकासाच्या चर्चेवरही त्यांनी घणाघाती प्रश्नचिन्ह उपस्थित केले.विकास कोणाचा आणि किती झाला, हे आता जनता स्पष्टपणे पाहते आहे,असा टोला लगावत त्यांनी आमदार गायकवाडांना सरळ आव्हान दिले.दरम्यान, नगरपालिका निवडणुकीच्या मोहीमेला जोर आल्यानंतर उमेदवारांचे मोर्चे, प्रचारयात्रा आणि घरदारी संपर्क मोहीम वेग पकडू लागल्या आहेत. थंडी असूनही राजकीय तापमान मात्र प्रचंड वाढले आहे. वसीम शेख यांच्या या आक्रमक हल्ल्यामुळे गायकवाड समर्थक आणि विरोधकांमध्ये चर्चांचा भडका उडाला असून बुलढाण्यातील निवडणूक आणखी रंगतदार होणार हे स्पष्ट झाले आहे.











