बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नगराध्यक्ष पदासाठी सर्वांच्या नजरा ज्या उमेदवारीकडे खिळल्या होत्या, ती अखेर शेवटच्या काही क्षणात दाखल झाली! बुलढाणेकरांच्या आग्रहास्तव भाजपकडून सौ. अर्पिताताई विजयराज शिंदे यांनी माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या सोबत दमदार पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करताच बुलढाण्यातील राजकीय वातावरण अक्षरशः पेटले आहे.
संपूर्ण दिवसभर सुरू असलेल्या राजकीय चर्चांना एका क्षणात वळण देत भाजपने मोठा ‘सप्राईज मूव्ह’ खेळला आहे. नगराध्यक्ष पदासाठी अर्पिताताईंची एन्ट्री ही जणू भाजपच्या रणनितीचा ‘क्लायमॅक्स सीन्स’ ठरली आहे. अर्ज दाखल होताच समर्थकांमध्ये प्रचंड आनंद उसळला असून पक्षात नवचैतन्याची लाट उसळली आहे.
अर्पिताताई या सर्वांना सामावून घेणारे, जमिनीशी जोडलेले नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. पक्षातील गटबाजीला शिस्त लावण्याची, कार्यकर्त्यांना एकत्र बांधण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे भाजप नेत्यांकडून ठामपणे सांगितले जात आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या खांद्यावरचा ताण वाढला असून निवडणूक रंगात येण्याआधीच बुलढाण्यात तुफान राजकीय गरमी निर्माण झाली आहे!














