बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भारतीय प्रेसच्या स्वातंत्र्याचा आणि सामाजिक जबाबदारीचा सन्मान करणारा राष्ट्रीय पत्रकार दिन बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन येथे रविवारी (16 नोव्हेंबर) दणदणीत उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि पहिली महिला पत्रकार तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांची ठोस आणि ऐतिहासिक घोषणा!
राजपूत यांनी जोरदार भाषणात सांगितले की पत्रकार हा समाजाच्या अव्यक्त वेदनांना आवाज देणारा योद्धा आहे. बुलढाणा जिल्ह्यात पत्रकारितेची परंपरा दशके जुनी असली तरी डिजीटल युगात धडाक्यात पुढे जाण्यासाठी आता मोठी झेप घेणे अत्यावश्यक आहे.
यावेळी त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले की जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी लवकरच ‘अभ्यास दौरा’ आयोजित केला जाणार असून दिल्ली–मुंबईसारख्या महानगरांमध्ये माध्यमांचे कामकाज, डिजीटल न्यूज रूम, नवनवीन तंत्रज्ञान यांचा प्रत्यक्ष अभ्यास करून बुलढाण्यातही आधुनिक आणि प्रभावी पत्रकारिता उभारण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. राजपूत यांच्या या घोषणेने सभागृहात एकच उत्साहाची लाट उसळली.
कार्यक्रमाला पत्रकार सर्वश्री राजेंद्र काळे, सुभाष लहाणे, भानुदास लकडे, राजेश डीडोळकर, रवींद्र गणेशे, जितेंद्र कायस्थ, जाकीर शाह, गणेश सोळंकी, कासिम शेख, वसिम शेख, विनोद सावळे, रहेमत अली, अजय राजगुरे, विलास सोनोने, राम हिंगे, राजाभाऊ दवणे, अभिषेक वरपे, अजय काकडे, आकाश भालेराव, फरझान, तुषार यंगड आदींची उत्स्फूर्त उपस्थिती होती.














